भारतीयांचा नेदर्लंड्स की डचांचा भारत ?

१०-१५ दिवसांपूर्वी एक लेख वाचण्यात आला - " भारतातील इंडिया ". त्यामधे सध्याच्या भारतीयांच्या सवयी कश्या चुकीच्या आहेत किंवा ब्रिटिश समाजाशी, आणि विचारसरणीशी  कश्या जवळच्या आहेत वगैरे लिहिल होत. भरपूर टीका होती त्यात. वाचून वाटल की खरच इतके चुकत आहोत का आपण; पण खरतर लेख वाचून सोडून दिला होता मी (एका खऱ्या भारतीयाप्रमाणे.. :P) . पण परवा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मला एक वेगळच चित्र दिसल.
१५ ऑगस्ट २०१०, भारतीय स्वातंत्र्याचा ६४वा वर्धापन दिन. मी सध्या आम्स्तर्दाममधे असल्याने  नेदर्लंड्स मधल्या भारतीय दूतावासात (इंडियन एम्बसी) जाण्याचा योग आला. मी आणि माझे काही भारतीय मित्र देन हाग (नेदर्लंड्सची दुसरी राजधानी - इथे नेदर्लंड्सचे सरकार आहे) मधल्या भारतीय दूतावासात  गेलो होतो.  पहिल्यांदाच जात असल्याने दूतावास म्हणजे नक्की काय आहे 
ह्याची काहीच कल्पना नव्हती. तिकडे पोहोचल्यावर बघितल तर एक (इंडियन standards नी)  मोठ्ठा बंगला वाटावा (पण नेदर्लंड्सच्या standards नी एक घर) अशी एक ईमारत दिसली.ती ईमारत म्हणजेच दूतावास आहे हे मान्य करण्यापलीकडे पर्याय नव्हता.
इमारतीच्या खूप मोठ्या नाही पण दूतावासास शोभेल अश्या दरवाज्यातून आत गेलो आणि अहो आश्चर्यम! साधारणपणे ५०-७० भारतीय ध्वजवंदनासाठी आलेले बघून शालेतल्या कवायती आठवल्या. अर्थात त्यावेळी मात्र भरजरी साड्या नेसलेल्या स्त्रिया आणि शर्ट-प्यांट घातलेले पुरुष - पूर्णपणे अनोळखी चेहरे -  समोर होते. आम्ही बरोबर १०.४५ वाजता पोहोचलो होतो (वेबसाइट वर ११ ची वेळ दिली होती) कार्यक्रम कधीही सुरु होईल अशी शक्यता होती. आम्ही सुद्धा त्या गर्दीमधे जाऊन मिसळलो. आमच्या नंतर सुद्धा बराच जनसमुदाय आला.आणि शेवटी बरोब्बर ११ वाजता कार्यक्रम सुरु झाला. (धक्का बसला?)
भारतीय अँब्यासीडर (दूत) असलेल्या मिस.भास्वती मुखर्जी (दोन आठवड्यापूर्वीच या पदावर नियुक्त झाल्या आहेत) यांनी सर्वांच स्वागत केल. एक सुरात जन-गण-मन झाल्यावर, मिस. मुखर्जींनी भारतीय राष्ट्रपति श्रीमती. प्रतिभा पाटील यांच देशवासियांना उद्देशून केलेल भाषण वाचून दाखवल. त्यानंतर वन्दे मातरम, रघुपति राघव आणि सरे जहाँ से अच्छा ही "देशभक्तिपर" गीते समूह स्वरात गायली गेली. नंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय केली गेली होती. इडली-चटनी, ढोकला, बर्फी, मसाला चहा असा बेत होता. आणि हो केवळ भारतीयाच नव्हे तर काही डच लोक देखील उपस्थित होते..त्यानी देखील सर्व पदार्थ मजेनी खाल्ले!
हे सगळ होत असताना काही गोष्टी समजल्या- सार्वजनिक कार्यक्रमात भारतात दिसत त्याचप्रमाणे  लहान जागा पण त्यामानाने गर्दी चांगलीच, अल्पोपहाराठी भारताप्रमाणेच रांगेत उभे राहणे, खाऊन झाल्यावर कचरा कचरा पेटीतच टाकणे, मिस. मुखार्जींचे वन्दे मातरम "वाचून" म्हणणे (!), भारतीय वंशाचे असुनही बऱ्याच काळ नेदर्लंड्समधे वास्तव्य असल्याने माहित असूनही हिंदी न बोलणारे लोक (मुली मुख्य म्हणजे.. ) दिसणे, आणि काहीच नाही तर राष्ट्रपतींच्या  भाषणाची छापील प्रत काय कामाची म्हणून सरळ कच्रयाच्या पेटीत टाकणारी माणसे दिसणे हे सगळा काहीतरी भलतच होत..तरीही आम्हाला त्या कार्यक्रमात मजा आली..
आता वेळ पाळणे, गर्दी होणे, राष्ट्रगीत वाचणे, डच आणि भारतीय एकत्र येणे हे वाचून हा कार्यक्रम डचांच्या भारतात होता की भारतीयांच्या नेदर्लंड्समधे ते ज्याच  त्यानच ठरवायच...!

Comments

Popular Posts