आमस्टरडॅमहून...

(हा लेख २०१७सालच्या 'माझे पुण्यभूषण' या दिवाळी अंकामधल्या 'परदेशी पुणेकर' या सदरासाठी लिहिला आहे.) 

माझा जन्म पुण्यातला; अगदी सदाशिव पेठेतला! पण मी पेठेतला असूनसुद्धा माझ्यामध्ये "पुणेरी" गुण फार कमी आहेत (निदान असं मी तरी समजतो). पण कदाचित ही उणीव भरून काढण्यासाठी मला नेदरलॅंड्स मध्ये यायचा योग आला असावा. मी २००९ साली "इरॅस्मस मुंडुस"ची शिष्यवृत्ति घेऊन इथे पी.एच्.डी. करायला आलो. मुक्काम पोस्ट: आमस्टरडॅम.

असं म्हणतात, की पुण्यात शिरलं की पुणेरी स्वभावाचं, भाषेचं दर्शन होतं आणि अनुभवदेखील येतात; दुपारी १-४ वेळात अपमानकारक उत्तरं मिळतील, अशा प्रकारचे विनोदही केले जातात. तसंच काहीसं नेदरलॅंड्समध्ये आल्यावर माझंही झालं. अगदी पहिल्याच दिवशी एका डच काकूंनी 'एवढं कसं कळत नाही तुला??' अश्या अविर्भावात माझ्याशी 'हितगुज' केलं. अर्थात चूक माझी होती, कारण भल्या पहाटे ७ वाजता चुकीचा नंबर डायल करून मी त्यांना त्रास दिला होता. पण पहिलाच दिवस होता; नवा देश, नवे लोक होते; त्यामुळे मी फारसं मनावर घेतलं नाही.

पुणे आणि आमस्टरडॅम दोन्ही शहरांच्या इतिहासात काही साम्यं आढळतात. पुण्याचा सर्वात जुना उल्लेख ८व्या शतकातल्या ताम्रपटांमध्ये "पुण्यक" या नावानी आढळतो; तर आमस्टरडॅमचा सर्वात जुना उल्लेख १३व्या शतकातल्या काही दस्तऐवजांमध्ये "आम्स्टेलडॅम" असा आढळतो. (आमस्टरडॅम शहर 'आम्स्टेल' नदीच्या काठावर वसलेलं आहे.) १६व्या-१७व्या शतकात आमस्टरडॅम ही एक महत्त्वाची जागतिक बाजारपेठ होती आणि म्हणूनच तो काळ डच लोकांसाठी एक सुवर्णकाळ होता. तिकडे १७व्या शतकात त्याचवेळी पुण्यात व एकूणच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्वाखाली सुराज्य नांदत होतं. कदाचित म्हणूनच त्याकाळी भारतात व्यापारासाठी आलेल्या डच-ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनादेखील महाराष्ट्राशी नातं जोडावंसं वाटलं.

पुणे आणि आमस्टरडॅम बद्दलचा सुरुवातीला माझ्या लक्षात आलेला एक विलक्षण योगायोग म्हणजे या दोन्ही शहरांसाठीचा एस.टी.डी. कोड '०२०' आहे! एकेकाळी पुण्याला सायकलींचं शहर म्हटलं जायचं. इकडे आमस्टरडॅममध्ये किंवा एकूणच नेदरलॅंड्स मध्ये आजही प्रत्येकाकडे सरासरी २ सायकली असतात. मंत्र्यांपासून अगदी लहान मुलांपर्यंत सर्व जण रोजच्या आयुष्यात सायकल वापरतात.  कुठल्याही रेल्वे स्टेशनच्या बाहेर सायकलींचा नुसता खच दिसतो. बऱ्याच ठिकाणी सायकल मध्ये हवा भरण्याचे पैसेही द्यावे लागत नाहीत. इथल्या कालव्यांमध्ये दरवर्षी अनेक सायकली पडतात. त्यातल्या बऱ्याच चोरी झालेल्या किंवा मोडलेल्या असतात; तर बाकीच्या अपघाताने पाण्यात पडलेल्या असतात.

हे कालवे म्हणजे आमस्टरडॅमची खासियत आहे. या कालव्यांमध्ये एकूण सुमारे दोन हजाराहून अधिक हाऊसबोट्स आहेत, ज्यामध्ये अनेक लोक कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत; आणि त्यासाठी त्यांना कर भरावा लागतो. इथे असलेल्या १६५ कालव्यांची एकूण लांबी सुमारे १००० कि.मी. आहे ज्यावर एकूण १३०० पूल बांधले गेले. आजही जलवाहतूकीसाठी या कालव्यांचा वापर केला जातो.

जल नियोजन,वाहतून नियोजन,शहर नियोजन या सगळ्याच बाबतीत आमस्टरडॅम पुण्यापेक्षा सरस आहे. वाहतुकीची शिस्त हा कदाचित एक मोठा आणि कळकळीचा मुद्दा ठरू शकतो. इथे पुण्यासारख्याच अनेक बागा आहेत; पण त्या केवळ लहान मुलांसाठी नाहीत. पर्यावरणाला हानी करू नये हा एकच नियम तिथे लागू होतो. इथली विशिष्ट शैलीत बांधलेली घरं बघताना एक अचंबित करणारी बाब सहजपणे लक्षात येत नाही, ती म्हणजे इथल्या अनेक घरांची उभारणी ही लाकडी ओंडक्यांच्या आधारावर बांधलेली आहेत. आमस्टरडॅम सेन्ट्रलचं रेल्वे स्टेशन १५-२० मीटर लांबीच्या ९००० ओंडक्यांवर उभं आहे!

पुण्याचं आणि इथलं राहणीमान, इथली शिक्षणसंस्था, इथले नियम या सगळ्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे खरा; पण तरीही काहीही चुकीचं वाटत नाही. कुठल्याही सरकारी कामामध्ये लोकांच्या सोयीला प्राधान्य दिलेलं दिसतं. स्वच्छतेकडे, पर्यावरणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेलं असतं. मुख्य म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे खुल्या विचारांनी पाहायची लोकांची सवय आणि कला लक्षात येते.

डच लोक पाण्याशी निगडीत अभियांत्रिकी कामांसाठी(वॉटर इंजिनिअरिंग)अतिशय प्रसिद्ध आहेत. पाण्याखालून जाणारे बोगदे,पाणी अडवण्यासाठी घातलेले मोठमोठाले बांध आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या जमिनीचा विचारपूर्वक केलेला उपयोग, पूर प्रतिबंधक स्वयंचलित यंत्रणेची उभारणी ही काही ठळक उदाहरणं. दुसरीकडे डच लोकांना संगणक व आय्.टी. क्षेत्रामुळे पुणे आणि बंगलोर ही शहरं माहित आहेत ही गोष्ट कळली की खूप अभिमान वाटतो.

आमस्टरडॅम शहर अफू, गांजा यासारख्या अमली पदार्थांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या अमली पदार्थांची काही ठराविक प्रमाणात केलेली विक्री इथे नियमबाह्य नाही आणि केवळ त्यासाठीच जगभरातून अनेक लोक या शहरात येतात!

पुणेकर पक्के खवय्ये आहेत आणि खास पुणेरी नावांची रेस्टॉरंट्सदेखील पुण्यात आहेत. डच लोकांकडे मात्र त्यांचे स्वतःचे असे विशेष खाद्यपदार्थ फार नाहीत. अनेकदा त्यांचं जेवण सुद्धा अळणी असतं. त्यामुळे शुद्ध डच रेस्टॉरंट्स कमी दिसतात. मात्र, इथे एका पंजाबी माणसाचं दुकान आहे. तिथे तो आणि त्याची बायको ‘कुकिंग लेसन्स’ घेतात; पंजाबी करी रोटी, नान असे पदार्थ बनवायला शिकवतात. त्याच्याकडे शिकायला येणाऱ्यांमध्ये डच मंडळीच अधिक असतात.

डच भाषा अतिशय प्रिय पण इंग्लिश बोलायलाही ते तयार असतात! पुणे विद्यापीठ आणि आमस्टरडॅम विद्यापीठ ही दोन्ही विद्यापीठं तिथे मिळणाऱ्या शिक्षणासाठी भारतात आणि नेदरलॅंड्समध्ये प्रसिद्ध आहेत. इथल्या आणि भारतातल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये खूपच फरक आहे. पण त्यापेक्षाही मला जाणवलेला एक ठळक फरक म्हणजे इथे विद्यार्थ्यांना 'विचार' करण्याची सवय अधिक लागते. 

डच लोकांना खेळ, नाटकं, संगीत,चित्रपट, संग्रहालयं यांबाबत असलेली रुची बघितली की पुण्याची आणि दर्दी पुणेकरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. असं म्हणतात की पुणेकर खास करून पेठांमधले लोक खाष्ट, कंजूस असतात असंही म्हटलं जातं. तर, त्यावर मी असं म्हणेन, की तुलनेने डच लोकही काही फार वेगळे नाहीत. जसा एखादा पुणेकर स्वतःला रोखठोक आणि त्याचबरोबर खुशालचेंडू समजतो, अगदी तसेच इथले (या देशातले) लोक आनंदी आहेत आणि स्पष्टवक्ते आहेत. पण ते आपल्याच विश्वात असतात, 'अपने काम से मतलब' ठेवणारे असतात. ते तुम्हाला चटकन आपल्या जवळ करत नाहीत. 

आपल्याकडे आपण लहान मुलांना सुट्टीत कधीही त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडे खेळायला पाठवतो; पण इथे असं चालत नाही. इथे त्यासाठी सुद्धा दोन्ही कुटुंबांना एकमेकांची अपॉइन्टमेन्ट घ्यावी लागते. एखाद्या डच व्यक्तीने पार्टीसाठी निमंत्रण दिलं आणि त्यामध्ये वेळ रात्री आठची असेल तर याचा अर्थ असा, की पार्टीमध्ये केवळ पेयं असतील. त्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या जेवणाचा बंदोबस्त करा! हे असं निमंत्रण विचित्र नक्की वाटतं, पण चुकीचं नाही वाटत. कारण त्यामध्ये त्या यजमानाने स्वतःची सोय बघितलेली असते. 

मला इथे आल्यावर एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली आणि आचरणातही आणावी लागली, ती म्हणजे वक्तशीरपणा. घड्याळाच्या काट्यांवर अवलंबून असलेली इथली माणसं बघितली की थक्क व्हायला होतं. कामाच्या वेळा ठरलेल्या. त्या वेळात कामाखेरीज बाकी काही नाही! उरलेल्या वेळात आयुष्य आनंदानं जगणारे लोक पहिले की त्यांचा हेवा वाटतो. 

आता जवळजवळ ८ वर्षं झाली मला इथे येऊन. तुळशीबाग, सारसबाग, चतुःशृंगी मंदिर, पर्वती, तळजाई यासारख्या जागांची सर इथल्या कुठल्याच जागेला नाही. इथे रिक्षा आणि रिक्षावाले काका नाहीत, आपल्यासारख्या पानटपऱ्या नाहीत, पाणीपुरी, कच्छी दाभेलीचे ठेले नाहीत, गोंगाट नाही. थोडक्यात काय, तर झोळी कधी कधी रिकामी वाटते. तरीही, आता मला जर विचारलं, की पुणे की आमस्टरडॅम? तर मी सांगेन- दोन्हीही शहरं मला तितकीच प्रिय आहेत... एक जन्मभूमी म्हणून आणि दुसरी कर्मभूमी म्हणून!

Comments

Post a Comment

Popular Posts