तक्षकयाग

काही दिवसांपूर्वी  टी.व्ही. वर "खुपते तिथे गुप्ते' नावाच्या प्रसिध्द कार्यक्रमात श्री. व सौ. नारकर यांची मुलाखत बघितली. या कार्यक्रमाच्या शेवटी त्या दोघांनी असं जाहीर केलं की ते सध्या एक "तक्षकयाग" नावाचं श्री. प्र. ल. मयेकर लिखित व्यावसायिक पातळीवरचं नाटक करत आहेत आणि लवकरंच ते आपल्यासमोर येईल.  त्यानंतर त्यांनी थोडक्यात नाटकाच्या नावाबद्दल वक्तव्य केलं - फार वर्षांपूर्वी राजा जन्मेजय याने एक नाग- यज्ञ केला होता ज्यामध्ये त्याने असंख्य विषारी साप आणि नाग मारले होते (कारण जन्मेजयाच्या वडिलांचा म्हणजेच राजा परिक्षिताचा एका तक्षक नावाच्या सर्प-दंशाने मृत्यू झाला होता). ह्या यज्ञामागे त्याचा हेतू असा होता की सर्व विषारी साप व नागांचा निःपात व्हावा. सध्या भारतामध्ये जे काही चालू आहे ते पाहून खरंच एक नाग यज्ञ करावासा वाटतो ज्यामध्ये सर्व विषारी कृतींचे आणि विचारांचे साप आणि नाग मारले जावेत. 
गेल्या वर्षाच्या  डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये एका २३ वर्षांच्या मुलीच्या बाबतीत जे झालं त्यामुळे त्या एका बलात्काराच्या बातमीने सर्वंच जगाचे लक्ष भारताकडे ओढले गेले.  त्या मुलीला वाचवायचे प्रयत्न (?) झाले; परंतु ती मुलगी वाचली नाही. हे तिचे सुदैव म्हणायचे का की ती ह्या क्रूर समाजातून सुटली? राजधानी दिल्लीत निदर्शने झाली, त्यावरून राजकारण रंगले, आणि जे काय टी.व्ही. आणि इतर प्रसार माध्यमांमधून समोर आले ते पाहून, वाचून माझ्यामनात काही प्रश्न उभे राहिले ते असे - 
१) खरंच भारत हा लोकशाहीसाठी लायक देश आहे का?
२) भारताच्या नागरिकांना आपल्या देशाबद्दल काही आदर, आस्था, प्रेम आहे का?
३) का भारतात एका स्त्रीला योग्य तो आदर, सन्मान आणि वागणूक मिळत नाही? किंवा पुरुषप्रधान संस्कृती कितपत योग्य आहे?
४) माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा बुद्धीने श्रेष्ठ आणि अधिक प्रगत मानावा का?
त्या एका बलात्काराच्या घटनेवर (इतर घटनांपेक्षा) जास्त लक्ष दिले गेले, दोषींवर खटला भरला गेला आणि जरा आशा निर्माण झाली की लोक सहजपणे ही गोष्ट विसरणार नाहीत पण पुन्हा सवयीनी प्रसारमाध्यमे आणि आपण सर्व काही विसरून आपल्या आपल्या दैनंदिन उपक्रमात मश्गुल झालो. असे कितीतरी प्रकार - बलात्कार, जबरदस्ती हे देशातल्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या गावात, शहरात रोज घडत असतात तिकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही आणि ते प्रकार काही थांबत नाहीत. पर-स्त्री तर सोडाच पोटच्या मुलीवर हे प्रसंग लादले जातात तर काय! ह्याला काय म्हणावे? पिता मुलीला चावतो काय, विकतो काय, मारतो काय, आपल्या देशातील तर सोडाच पण परदेशातील मुलींचे पण नशीब बिघडवतो आपण? काय हक्क आहे आपल्याला? इतकी विकृत मनोवृत्ती कोणाची, कुठून, कशी आणि का आली? म्हणजे फक्त पुरुषांनीच शांतपणे, ताठ मानेने जगावे हा कुठला नियम? एकीकडे मुलीला जन्म दिलेला पसंत नाही, मान्य नाही (ज्यामुळे सामाजिक आणि नैसर्गिक समतोल बिघडत आहेच) आणि त्यावर हे असे प्रकार. स्त्रियांनी आणि मुलींनी करावे काय मग?
ह्यावर उपाय काय? कुणी म्हणते ह्याला मुलीच जबाबदार आहेत, कुणी म्हणते मुलींनी मर्यादा सांभाळाव्यात (?), कुणी म्हणते मुलींना मोबाईल वापरायला देऊ नये, कुणी म्हणते मुलींनी जीन-पँट घालू नये.. हे काय उपाय झाले? आणि तुम्ही कुठल्या काळात रहात आहात? जग कुठे चाललंय आणि भारताची दिशा कुठली आहे? मोठमोठ्या प्रगतीच्या, एक प्रबळ जागतिक सत्ता होण्याच्या बाता करता आणि आचरण असं? असे उपाय सुचवून समाजाला पुन्हा जुन्या, अप्रगत, अधिकच पुरुषप्रधान काळात घेऊन जायचा विचार आहे का? म्हणजे स्त्रीने घराबाहेर पडू नये, स्त्रीने शिकू नये - हेच चालू द्यायचं आहे का? सगळं सरकारवर टाकायचं आणि हात वर करायचे.. ह्या परिस्थितीवर आपणच स्वतः उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करायची की  सरकारची वाट पहायची? आपणच स्वतःचे विचार बदलायला हवेत, आपली विकृत मनःस्थिती सुधारायला हवी त्यात सरकार काय करणार? सरकारनी कठोर शिक्षा द्यावी एवढी मात्र एक आवश्यक बाब आहे. ह्या शिक्षा अश्या असाव्यात कि त्या बघून किंवा ऐकूनच थरकाप उडाला पाहिजे आणि त्या नीट अमलात आणल्या गेल्या पाहिजेत. (माझ्या एका सहकर्म्याला वाटतं की जर त्याच्या मुलीच्या बाबतीत असं काही झालं  तर तो सरळ गोळी झाडेल) पण भारतात सध्या साधी शिक्षासुद्धा लवकर होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये कसलंच भय नाही. अगदी रहदारीचे नियम तोडण्यापासून ते खून, बलात्कार, चोऱ्या-दरोडे इथपर्यंत लोकांची मजल अगदी सहज जाते. देशामध्ये खूप श्रीमंत आणि खूप गरीब अशी मोठी दरी असल्याने दोन्ही वर्गांना कसलीच भीती नाही. श्रीमंत लोक पैशाच्या जोरावर राज्य करतात आणि गरीब माणसाकडे घालवावेसे काहीच नसते..त्याला कसली भीती! 
सध्या घरातले वातावरण, शिक्षण, मित्रांची संगत, चित्रपट, आणि समाजाची धाटणी ह्या सगळ्या गोष्टी, एकत्र किंवा वेगवेगळ्या, ह्या विषारी सापांना अनुकूल आहेत.  घरात जर सुशिक्षित लोक असतील तर जरातरी ह्यावर आळा बसतो पण सध्या तेही होताना दिसत नाही. सुशिक्षित गुन्हेगारांची संख्या वाढते आहे. उच्च शिक्षित बरेच लोक, काही स्वेच्छेने (देशाचे जे व्हायचंय ते होऊ दे ह्या विचारानी) तर काही नाईलाजाने, परिस्थितीला कंटाळून परदेशात स्थायिक झाले आहेत, होत आहेत. देशात प्रत्येक लहान-मोठ्या क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार परिस्थितीला पूरक आहे. जात-पात जन्मजात पाळले जात आहेत..कुणाला काय सांगावे..
काही लोक ठामपणे म्हणतात की हे सर्व चित्रपटांमुळे होते पण हे चित्रपट आपण सर्वांमुळेच प्रचलित, प्रसिद्ध होतात. म्हणजे एकेकाळी एका चांगल्या अभिनेत्रीला सिने-क्षेत्रातून बहिष्कृत करण्यात आले; कारण - ती तोडके कपडे घालते; आणि आता एका पॉर्न-स्टारलाच आपण अभिनेत्री म्हणून स्वीकारतो? आता तुम्ही तुमची आवडच जर बदललीत तर मग असे प्रकार घडणार यात काही नवल नाही. प्रत्येक चित्रपटात एक आयटम गाणे असलेच पाहिजे का? एका अभिनेत्रीने उत्तेजक कपडे निदान एका दृश्यात तरी घातलेच पाहिजेत हे कुठले नवीन नियम आपणच बनवले आहेत? पूर्वी आयटम गाण्याशिवाय चित्रपट चालत नसत का? आणि सध्या देखील कितीतरी कलाकार आहेत जे एक वेगळा आणि चांगला प्रयत्न करू पाहतात ज्यातून चित्रपटाचा आनंद तर मिळेलच पण शिवाय समाज सुधारेल, बदलेल, घडेल..पण त्या प्रयत्नांना हवं तसं प्रोत्साहन किंवा कौतुक मिळेलच असं  नाही. याला कोण जबाबदार? 
बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की त्यांच्यामते भारतात सध्या एकही असा राजकारणी नाही ज्याच्याकडे पाहून काही अपेक्षा कराव्यात. ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती. अर्थात राजकारणात उतरणं न उतरणं हे ज्याचं त्यांनी ठरवावं पण नाही गेलात राजकारणात तर निदान समाजात राहून तरी आधी स्वतःला आणि मग इतरांना वळण लावाल? रोजचं वर्तमानपत्र वाचणं आता लोक सोडून देऊ लागले आहेत कारण त्यात नवीन असं वाचण्यासारखं फारच कमी असतं हल्ली. रोज त्याच त्याच बातम्या वाचायला मिळतात. आणि त्यामुळे एक प्रकारचं नैराश्य येतं. राजकारणी लोक एकमेकांवर तोफा डागत असतात आणि आपण सगळे ह्या बातम्या वाचून त्यातून विनोद निर्मिती करतो. राजकारण करण्यासाठी अगदी एखाद्या निर्जीव पुतळ्यापासून ते एका चित्रपटापर्यंत काहीही पुरावं? कुठे नेतंय  हे सगळं आपल्याला? कोणाला कशासाठी उचलून धरलं जावं ह्याला काही मर्यादा?
कालंच एक डॉक्युमेंट्री फिल्म बघितली. त्यात त्यांनी दाखवलं होतं की भारतीयांनी जगाला पुढे नेण्यात बराच हातभार लावला आहे. मुख्य म्हणजे अंकांची आणि त्यातही शून्याची निर्मिती, ग्रंथ, वेद , योगविद्या, साधारण १२व्या-१३व्या शतकात घरबांधणी, प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा (हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती), व्यापारासाठी तराजू, नाणी, कापसाची पैदास, हातमागावर तयार होणारं कापड, वनस्पतींपासून तयार केले गेलेले रंग (डाय), ब्राँझच्या मूर्ती एका साच्यात बनवण्याची शक्कल ह्या आणि अशा अनेक गोष्टी भारतामुळे पुढे जगात पसरल्या. हे पाहून खरच खूप खूप अभिमान वाटला. पण सध्याचा भारत बघितला की असं वाटतं "नाही, डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवलेला भारत हा कुठलातरी वेगळाच देश आहे."
किती दुर्दैवाची गोष्ट आहे ही.
मित्रहो, खरंच आता जर आपण सावरलो नाही, ताळ्यावर आलो नाही तर भारतासारख्या बलाढ्य देशाचे नाव, वैभव ह्या अश्या घटनांमुळे धुळीस मिळेल. एका दिवसात बदल घडणं अशक्य आहे मान्य आहे पण निदान बदल घडवायला सुरवात तरी करूयात. जगात कुठेही असाल, जे कराल ते करताना देशाचा विचार मनात असू द्यात. विचार आणि मनस्थिती बदला सगळं बदलेल.

Comments

Post a Comment