अॅम्स्टरडॅम (स्मोकिंग) पाईप म्युझियम
कल्पना करा की तुम्ही एखाद्या शहरात काही वर्ष सलग राहतआहात. नंतर अशी एक वेळ येते जेंव्हा काही कारणानं ते शहर सोडून तुम्हाला दुसरीकडे जावं लागतं. मग पुन्हा कधीतरी मित्रांसोबत त्या जुन्या शहरात तुम्ही फिरायला येता आणि अचानक अशी एखादी जागा तुम्हाला सापडते जी 'या शहराबद्दल आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी कळायच्यात' असा निष्कर्ष काढायला तुम्हाला भाग पाडते. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालं. अॅम्स्टरडॅम सोडून जेमतेम ६ महिने झाले होते पण २०१७च्या डिसेंबर महिन्यात पुन्हा जेंव्हा अॅम्स्टरडॅममध्ये आम्ही फिरायला आलो होतो तेंव्हा, 'आपल्याला मोजक्या वेळात काय करता येईल' हा विचार करत असताना, गूगल मॅप्स आणि ट्रिप अॅडव्हायजर नी आम्हाला अॅम्स्टरडॅम मधल्या "पाईप म्युझियम" मध्ये आणून सोडलं. अॅम्स्टरडॅम शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या प्रिन्सेनख्राक्त या कालव्याच्या परिसरात असलेल्या एका जुन्या बिल्डिंगमध्ये "अॅम्स्टरडॅम पाईप म्युझियम" किंवा "पाईपेन् काबिनेत" उभं आहे. सुमारे चाळीस वर्षांहून अधिक काळ लोकांसाठी खुलं असलेलं हे संग्रहालय खूप मोठं नसलं तरी त