Oranje is de kleur van gekte

Orange is the colour of craziness!! हे Vincent van Gogh च वाक्य परवा खरोखरच प्रत्यक्षात उतरल. प्रसंग होता "फीफा वर्ल्ड कप २०१०" चा अंतिम सामना.. स्पेन आणि नेदरलैंड.. दोन्ही देश यशस्वीरित्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेले.. पण खरी कसोटी तर त्या दिवशी लागणार होती.
आम्स्तरदाम अंतिम सामन्यासाठी पूर्ण तयार होत.. आणि आम्स्तरदामच काय तर पूर्ण नेदरलैंड नारिंगी रंगानी न्हाऊन निघाल होत.. बघावा तिकडे नारिंगी रंग. सामना रात्री ८.३० ला सुरु होणार होता पण आम्स्तरदाममधल्या म्युझीयमप्लेन भागात ५.३० पासूनच गर्दीला उधाण आल होत. मी आणि माझा मित्रपरिवार ती सगळी मजा पहिल्यांदाच पाहत होतो.  आणि खरतर त्यासाठीच तिथे जाऊन सामना बघायच आम्ही ठरवल होत.. सर्वत्र नारिंगी रंग पसरला होता. जो तो फ़क्त नारिंगी रंगाचेच कपडे घालून फिरत होता.. त्यांच्या टोप्यांचे आणि विशेषतः नारिंगी टोप्यांचे देखील विविध प्रकार बघायला मिळत होते. ( http://picasaweb.google.com/wishwas2610/ACDICF?locked=true# ) ट्राम आणि बसेस 'नारिंगी' लोकाना घेउन जात होत्या.. वुवुझेला नामक कर्णकर्कश पिपाण्यानी आसमंत गाजत होता . लोक नाचत होते गात होते. बीअर चे ग्लास भरभरून इकडून तिकडे जात होते... जणू काही वर्ल्ड कप च्या सामन्यापेक्षा लोक फक्त पार्टी करायला आल्यासारखे वाटत होते. जसजसा वेळ जात होता तसतसे लोक अजूनच धुंद होत होते.. गर्दी वाढतच होती. म्युझीयमप्लेन पूर्णपणे नारिंगी होत होते.. ५ मोठाले स्क्रीन्स सुधा अपुरे पडतील की काय अस वाटत होते.. शेवटी साधारण ७.३० वाजल्यापासून एका सुत्रधाराने सूत्र हाती घेतली.. तो लोकाना गाणी म्हणायला उद्युक्त करत होता.. टाळ्या वाजवत लोक त्याच्याबरोबर आणि एकमेकांबरोबर झुलत होते.. गोल रिंगण  करून नाचत होते.. जल्लोष चालू होता. आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी स्फुर्तिगीते गात होते.. जणू काही त्यांचा आवाज त्यांच्या संघापर्यंत, संघातल्या प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचत होता.. तो सोहळा जगभरातील लोकांना बघता यावा यासाठी धडपडणारे पत्रकारदेखील त्यांच्यामाधे सामील होत होते. Helicopters मधून देखील शूटिंग केल जात होत. काही Helicopters मधून नारिंगी, झेंडूच्या जातीतल्या फुलांचा वर्षाव देखील मधून मधून होत होता. खुपच देखण दृश्य होत ते. एकूणच मजा येत होती... आणि आम्ही देखील नारिंगी रंगाचे कपडे घालून त्या जनसमुदायात हरवून गेलो होतो.  
शेवटी एकदाचा सामना सुरु झाला आणि  सगळी कडे शांतता पसरली. सर्व नजरा स्क्रीनकडे खीळल्या. संपूर्ण सामना संपेपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक चिंता दिसत होती. गोल चुकला किंवा पंचानी चुकीचा निर्णय दिला तर त्या प्रकाराचा शाब्दिक समाचार पण चांगलाच घेतला जात होता. शेवटी ज्या वेळी सामन्याचा निकाल लागला त्यावेळी निराश झालेले चेहरे बरेच काही सांगून गेले. १२०००० लोकांचा तो जनसमुदाय निराश मनाने घराकडे वळला... शेवटी त्या म्युझीयमप्लेनमधे उरले ते फक्त नारिंगी रंगाचे  वुवुझेला, बरयाच  प्रमाणात कचरा.. आणि एक प्रकारच  नैराश्य.
मात्र हे सर्व होउन देखील आपल्या संघाचे स्वागत करायला लोक मागे राहिले नाहीत.. मायदेशी परतलेल्या संघाची शहरातल्या कालव्यांमधून एक छानशी मिरवणूक काढण्यात आली आणि सर्वात शेवटी पूर्ण संघाचा म्युझीयमप्लेनमधे जाहीर सत्कार केला गेला. त्यावेळीही त्या ओरान्यप्लेनमधे  (नारिंगी रंगात न्हाऊन निघालेला म्युझीयमप्लेनचा पूर्ण परिसर) कमीतकमी २० ते २५ हजार लोक होते.. शिवाय कालव्यांच्या काठची गर्दी वेगळीच.. खेळाडूदेखील अतिशय प्रसन्न मनानी तो सत्कार स्वीकारत होते.. तरी प्रत्येकाला मनातून थोडासा अस्वस्थ करत होता "एक गोल"...
खरच Oranje is de kleur van gekte !!!

Comments

Post a Comment

Popular Posts