आमस्टरडॅम (स्मोकिंग) पाईप म्युझियम

कल्पना करा की तुम्ही एखाद्या शहरात काही वर्ष सलग राहतआहात. नंतर अशी एक वेळ येते जेंव्हा काही कारणानं ते शहर सोडून तुम्हाला दुसरीकडे जावं लागतं. मग पुन्हा कधीतरी मित्रांसोबत त्या जुन्या शहरात तुम्ही फिरायला येता आणि अचानक अशी एखादी जागा तुम्हाला सापडते जी 'या शहराबद्दल आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी कळायच्यात' असा निष्कर्ष काढायला तुम्हाला भाग पाडते. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालं. आमस्टरडॅम सोडून जेमतेम ६ महिने झाले होते पण २०१७च्या डिसेंबर महिन्यात पुन्हा जेंव्हा आमस्टरडॅममध्ये आम्ही फिरायला आलो होतो तेंव्हा, 'आपल्याला मोजक्या वेळात काय करता येईल' हा विचार करत असताना, गूगल मॅप्स आणि ट्रिप अडव्हायजर नी आम्हाला आमस्टरडॅम मधल्या "पाईप म्युझियम" मध्ये आणून सोडलं.

आमस्टरडॅम शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या प्रिन्सेनख्राक्त या कालव्याच्या परिसरात असलेल्या एका जुन्या बिल्डिंगमध्ये "आमस्टरडॅम पाईप म्युझियम" किंवा "पाईपेन् काबिनेत" उभं आहे. सुमारे चाळीस वर्षांहून अधिक काळ लोकांसाठी खुलं असलेलं हे संग्रहालय खूप मोठं नसलं तरी त्यामधल्या जवळ जवळ सगळ्याच संग्रहित वस्तू आणि स्मोकिंग पाईप्स हे सुमारे २५ शतकांहून अधिक काळ जगभरात वापरल्या गेल्या आहेत. आत शिरताना तळघरात अनेक कलाकृती असलेले लाकडी, आजच्या लोकांमध्ये जास्त प्रचलित किंवा आवडले जाणारे पाईप्स विकायला ठेवले आहेत. तिथल्या लाकडी कपाटांच्या प्रत्येक ड्रॉवरमध्ये असलेले अनेक प्रकारचे नक्षीदार पाईप तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्या पाईप्सची किंमत काही-शे युरो ते काही हजार युरोंपर्यंत आहे. ते पाईप्स बघून तुमची उत्कंठा नक्कीच वाढते आणि मग पूर्वकल्पना नसताना तुम्ही तिथे आला असाल तर तुम्ही लगेचच तिकीट काढून तिथल्याच एका सहकाऱ्याबरोबर तुम्ही एका दरवाज्यातून आत जाता आणि पाईप्सच्या दुनियेत शिरता.

संग्रहालयाची एक झलक तुम्ही इथे बघू शकता - https://photos.app.goo.gl/aEd4n09RGAsay5xP2

साधारण १९६९ साली एक खाजगी संकलन म्हणून सुरु झालेल्या या संग्रहालयाचं वय जरी फारसं नसलं तरी त्याच्या जडणघडणीचे तीन टप्पे मानले जातात. सुरवातीच्या टप्प्या मध्ये जास्त भर वस्तूंचा अथवा पाईप्सचा संग्रह करण्यावर होता. त्यावेळी खास हॉलंडचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्ले (चिकणमाती) स्मोकिंग पाईप्सच्या प्रदर्शनावर भर असायचा. साधारण १९७५-१९८२ च्या काळात हे संग्रहालय आमस्टरडॅम मधल्या फ्रेड्रिक्सप्लेन या भागात होतं. दुसऱ्या म्हणजेच "लाय्देन" टप्प्यामध्ये संकलन वाढलं आणि "पाईपेन् काबिनेत" ला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळाली. याच काळात संग्रहालयातर्फे स्वतःचे शोधनिबंध देखील प्रकाशित होत असत. तिसऱ्या टप्प्यात म्हणजे १९९५ सालापासून हे संग्रहालय आत्ताच्या ठिकाणी वसलं, संग्रहालयाचे एक संकेतस्थळ बनवण्यात आले आणि संग्रहालय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. २०१० नंतर आलेल्या चौथ्या किंवा डिजिटल टप्प्यात संकलनाचे फोटो आणि माहिती संग्रहालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाले. 

पाईप बनवण्यासाठी वापरलेलं साहित्य (घटक पदार्थ अथवा धातू), तंत्रज्ञान, पाईप चा वापर आणि उगमस्थान अश्या काही बाबी लक्षात घेऊन या संग्रहालयातील पाईप्सचं वर्गीकरण केलेलं आहे. या संग्रहालयातल्या अनेक पाईप-हेड्स वर त्या-त्या काळातले सामान्य माणसाचे, प्रसिद्ध व्यक्तींचे उदा. राजकारणी, खेळाडू, अभिनेते इत्यादी. चेहरे कोरलेले आहेत. एक अनोखी बाब म्हणजे काही कपाटांमध्ये खास फ्रेंच पाईप-हेड्स एकत्र सजवून ठेवली आहेत. आणि त्या वरती एक पांढरा लांब पाईप फुलं आणि रिबीन लावून सजवून ठेवलेला बघायला मिळतो. त्यामागेसुद्धा एक गंमत आहे. असं म्हणतात की पूर्वी डच लग्नांमध्ये नवरा-बायको एकमेकांना असे सजवलेले पाईप द्यायचे आणि जर हा पाईप फुटला किंवा तुटला तर लग्न तुटणार असं समजलं जायचं!  एकूण सुमारे १७ उपविभाग या संग्रहालयात आहेत. त्यातही पहिले वर्गीकरण पाईप आणि बिगर-पाईप अश्या श्रेणींमध्ये केलेलं आहे. बिगर-पाईप गोष्टींना 'व्हारिया ऑब्जेक्ट्स, असं म्हटलं जातं. जगभरातून गोळा करून, जतन करून ठेवलेले अफू, गांजा यांचं सेवन करण्यासाठी बनवण्यात आलेले पाईप्स आणि हुक्का देखील आहेत.या संग्रहालयाच्या मूळ संग्राहकाचं नाव, त्याच्याच इच्छेमुळे, आपल्याला सांगितलं जात नाही.  तुम्हाला पाईप स्मोकिंग येत नसेल तर तेही तुम्हाला या संग्रहालयातर्फे शिकता येतं त्यामुळे तुम्ही कधी अॅम्स्टरडॅमला आलात तर हे अनोखं संग्रहालय नक्की बघा!

संग्रहालयातल्या वेगवेगळ्या पाईप्सचा थोडक्यात घेतलेला हा आढावा!
(खालील फोटो संग्रहालयाच्या संकेतस्थळावरून साभार घेतले आहेत.)


प्रागैतिहासिक पाईप
प्रागैतिहासिक संकलन (ख्रि.पू . ५ वे ते इ.स. १६ वे शतक)

या श्रेणीतले बहुतांश पाईप हे जुन्या मध्य व दक्षिण अमेरिकेतल्या प्री-कोलंबियन संस्कृतीतले आहेत. हे सर्व पाईप्स मुख्यत्वे सिरॅमिक आणि अगदी मोजके पाईप्स हे कोरीव काम केलेले आहेत. या श्रेणीमधले एकूण ७८ पाईप्स आपल्याला बघायला मिळतात.


उत्खननात सापडलेले पाईप

कवटी कोरलेला स्टीलचा इंग्लिश पाईप 
वाईनचा जग कोरलेला फ्रेंच पाईप 

पारंपारिक डच इसाबे 
                                                                                                                                                                     
या श्रेणी मध्ये या संग्रहालयातले सर्वात जास्त पाईप्स (सुमारे ७९२५) समाविष्ट आहेत. मुख्यत्वे नेदरलँड्स व पश्चिम युरोपात उत्खननात सापडलेल्या पाईप्स आणि तुकड्यांना या देशाच्या पुरातत्व विभागात अनन्य साधारण महत्त्व आहे कारण त्यामुळे या देशाचा स्मोकिंगचा इतिहास समजतो. आणि म्हणूनच या सर्व वस्तूंची संपूर्ण माहिती या संग्रहालयातर्फे गोळा केली गेली आहे. प्रत्येक पाईपासाठी तो उत्खननात कुठे सापडला, कुठल्या प्रकारच्या मातीत सापडला, कुठे बनवला गेला, त्याचा ब्रँड अशी सगळी माहिती संग्रहालयातर्फे प्रकाशित हस्तपुस्तिकांमध्ये उपलब्ध आहे. वर म्हटल्याप्रमाणे वाळकी फुले आणि मळक्या-फाटक्या रिबिनी असलेले अनेक लांब डच पाईप्स उत्खननात सापडले. 


मातीचे पाईप (इ.स. १९ वे आणि २० वे शतक)

फुलांची नक्षी असलेला सिगार होल्डर 
पराभूत सेनानी 
शिकारीसाठी उपयोगी भोंगा (हॉर्न) आणि कुत्रा






या श्रेणीमध्ये संपूर्ण युरोपात लोकांकडे असलेले खाजगी, विक्रीसाठी खास बनवलेले, फॅक्टरी किंवा दुकानातले आणि मातीपासून बनवलेले पाईप्स आपल्याला बघायला मिळतात. या पाईप्सवर असणाऱ्या नक्षीकामांमध्ये खूपच विविधता आहे. मातीचे पाईप्स हे एकावेळी एकाच साच्यातून आणि अनेक प्रमाणात बनवले जात असल्यामुळे एखादा तुटक पाईप बदलून तेच नक्षीकाम असलेला, त्याच ब्रँडचा पाईप या संग्रहालयात प्रदर्शित केला जातो. या संग्रहालयातले काही पाईप्स हे तर त्या त्या कंपनीने बनवलेल्या पाईप्स पैकी आत्ता उरलेले किंवा बघायला मिळणारे असे एकमेव पाईप्स आहेत. यातले काही पाईप्स उत्खननात सापडले असल्यामुळे वर उल्लेखलेल्या श्रेणीमध्ये सुद्धा मोजले जातात.  साधारण ६७७० पाईप्स या विभागात उपलब्ध आहेत. 

सिरॅमिक पाईप

या विभागात साधारण २३२० पाईप्स आहेत. हे पाईप्स बहुतकरून इंग्लंडमधल्या ब्रिटनी आणि स्टॅफोर्डशायर भागातून मिळवले आहेत.
स्टॅफोर्डशायर मध्ये बनवलेला वाटोळे घातलेल्या माश्याची प्रतिकृती असलेला पाईप

मेरशाम सारखा बनवलेला सिरॅमिक पाईप  


पोर्सेलीन पाईप

या विभागातले ९२१ पाईप्स हे जर्मनी, सॅक्सोनी, बोहेमिया, फ्रान्स, डेन्मार्क आणि नेदरलँड्स मध्ये सापडलेले अथवा बनवले गेलेले आहेत. खरं तर पोर्सेलीन हे पाईप बनवण्यासाठी उपयुक्त नाही असं मानलं जातं पण तरीही अतिशय सुंदर रेखीव कलाकृती असलेले पोर्सेलीन पाईप्स इथे बघायला मिळतात.

नेपोलियन काळातला सैनिक 
फॅशनेबल हॅट घातलेली स्त्री 

मेरशाम पाईप

मेरशाम पाईप्स हे सर्वात सुंदर पाईप्स म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांवर केलेलं कोरीव अतिशय सुंदर असतं आणि त्याची निगा राखणं हे अतिशय महत्त्वाचं आणि तितकंच आव्हानात्मक असतं. या संग्रहालयात ४३४ मेरशाम पाईप्स आहेत.

हंगेरीच्या इतिहासातला एक प्रसंग दर्शवणारा कप 

एक रिगल पोर्ट्रेट 
लाकडी पाईप


या विभागात १३४० पाईप्स आहेत. यातले बरेचसे पाईप्स हे एकोणिसाव्या शतकात तयार केलेले तर काही मोजकेच अठराव्या शतकातले आहेत. हे पाईप्स मुख्यत्वे ब्रायर (झाडाचे नाव) पाईप्स आहेत पण अनेक लाकडी कोरलेल्या पाईप्स वर त्या काळच्या आणि त्या-त्या ठिकाणच्या लोक-कला आणि अभिव्यक्तीचं दर्शन आपल्याला होतं. यापैकी बरेचसे पाईप्स हे जर्मनीतल्या उल्म या ठिकाणी बनवले गेलेले आहेत. यापैकी जुने पाईप्स बहुदा हाताने कोरलेले आहेत तर नवनवे पाईप्स हे कारखान्यांमध्ये साच्यातून बनवलेले आहेत.

  नेपोलियनला समर्पित पाईप-हेड 
लोक-कलेचं उदाहरण देणारा पाईप













---

Comments

  1. अप्रतिम माहितीपूर्ण लेख. धन्यवाद आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  2. मस्त माहिती आणि फोटो. ट्रिपअ‍ॅडवायझरमुळे खरंच अशा वेगवेगळ्या गोष्टी समजतात.

    ReplyDelete
  3. खुपंंच बारकावे लेखात पकडले आहेत. कोरलेल्या पाईपसारखे. :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts