आनंदयात्री व्हा!

(हा लेख २०१६ साली नेदरलॅंड्स मधील आल्मेलो या ठिकाणी झालेल्या ११व्या युरोपीय मराठी सम्मेलना निमित्त प्रकाशित झालेल्या स्मरणिकेसाठी लिहिला आहे.) 

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे; खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे।
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले; इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे ।।

बालकवींच्या या ओळी वाचल्यावर नवल वाटतं की खरंच कवीला (अथवा कवयित्रीला) किती गोष्टींमधून आनंद सापडत असेल! लहानपणापासून आपण ऐकत असतो "अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्रमुख गरजा आहेत" आणि मागच्याच वर्षी एका चित्रपटात पाहिल्याप्रमाणे, कितीही नाही म्हटलं तरी, या तिन्हींमध्ये "वाय्-फाय्"ची भर पडली आहे. पण त्याहीपेक्षा या तीन गोष्टींबरोबर कुठल्याही गोष्टीतून किंवा कामातून "आनंद" मिळणं महत्त्वाचं नाही का? आणि त्यासाठी खूप काही करायची खरच गरज नसते. म्हणजे आपण दररोज जे काही करतो, आपली दिनचर्या काहीही असो, प्रत्येक गोष्टीत कुठे ना कुठे दडलेला आनंद जर आपल्याला मिळाला तर 'दिवस फार कंटाळवाणा गेला बुवा' असं आपण कधीच म्हणू शकणार नाही!

सकाळी उठल्यावर 'काय फ्रेश वाटंतय!' असं जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा नव्या दिवसातला तो आनंदच आपण एक प्रकारे व्यक्त करत असतो असं मला वाटतं. टूथपेस्टच्या चवीतला आनंद, थंडीच्या दिवसात गरम पाण्यात मनसोक्त डुंबत राहून अंघोळ करायला मिळण्यातला आनंद, आवडता साबण वापरतानाचा आनंद, गरम गरम चहा पितानाचा आणि बरोबर पोहे, उपमा खातानाचा आनंद अश्या वेगवेगळ्या रुपात आनंद आपल्याला मिळत असतो. पण हल्ली धावपळीच्या जगात तो आनंद तेवढा उपभोगता येत नाही हेही तितकंच खरं. पण म्हणतात ना जेंव्हा एक दरवाजा बंद होतो तेंव्हा अजून एक उघडतो. म्हणजे बघा हं, काही जणांना सकाळी सकाळी रेडियो ऐकायची सवय अजूनही आहे पण घरी असतानाच रेडियो ऐकू शकतो असं आता अजिबात राहिलेलं नाही. प्रगत तंत्रद्यानाची कृपा, की आपला हा साथी आता आपल्याबरोबर कायम असतो. त्यामुळे त्या आनंदाला आपण मुकतो आहोत असं सहसा तरी होत नाही. बस, मेट्रो, गाडी यापैकी कुठल्याही साधनांचा आपण वापर करत असलो तरी बातम्या, गाणी यांपासून आपण फार दूर नसतो. पूर्वी कृष्णधवल काळात दूरदर्शनवरून चिमणराव-गुंड्याभाऊंनी, चिंगी आणि गोट्यानी जसं निखळ मनोरंजन केलं तसंच किंबहुना त्यापेक्षा अधिक पटीनं जास्त मनोरंजन करणारे कार्यक्रम आपल्याला सध्या टीव्ही चॅनेल्सवर बघायला मिळतात. गाण्याचे किंवा नाचाचे कार्यक्रम, चित्रपट, खेळ, शैक्षणिक कार्यक्रम, डॉक्युमेंट्रीज् हे सर्व घरी बसल्या आपल्याला अनुभवायला मिळतं ह्यातला आनंद वेगळाच नाही का! याशिवाय संगणक, लॅपटॉप्स, स्मार्ट फोन्स यांच्यातून क्षणाक्षणाला आनंद मिळत असतोच की! पण अर्थात त्यांच्या आहारी नाही गेलं तरच!

मध्ये एकदा शाळेतल्या गमती-जमती दाखवणारा एक कार्यक्रम टी,व्ही.वर प्रसारित झाला. काय धमाल यायची तो बघताना! म्हणजे शाळेतल्या दिवसांच्या आठवणी निघाल्या की दंगा-मस्तीच्या, चिडवाचिडवीच्या गोष्टी आठवतातंच पण बोरकुट, गोळ्या, चॉकलेट्स, क्रीमची बिस्कीटं, केक, ढोकळा, इडली-चटणी किंवा वडे घेऊन येणाऱ्या बाई या सगळ्या गोष्टीपण ओघानी आठवतातच. त्यावेळी त्यांच्यामुळेच आपल्याला तो आनंद मिळाला होता हे आज अगदी आवर्जून जाणवतं. मान्सूनच्या पावसात वाफाळलेली कॉफी किंवा चहा आणि त्याबरोबर गरम कांदा भजी हा योग तर आपण कधीच सोडत नाही! त्याला पर्याय म्हणून काही जणांना छान भाजलेला भुट्टाही आवडतो! त्या दिवसांत खडकवासला, सिंहगड परिसरात एक फेरी तरी नक्कीच होते. अनेक गिर्यारोहक अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं गड आणि किल्ल्यांना भेटी देण्याचे प्लॅन दरवर्षी बनवतात आणि पारही पडतात. हिवाळ्यात तिखट-मीठ लावलेली पेरूची फोड मिळत असेल तर कधीच आपण त्याला नको म्हणत नाही!

दररोज फेरफटका मारायला बाहेर पडलो की शॉपिंग किंवा फारफार तर  विंडो-शॉपिंग मधूनही आनंद आपण घेत असतो. रस्त्यातून येता-जाता होणाऱ्या गमतींचे साक्षीदार असतो आणि अश्या गोष्टी कधी आठवल्या तर नकळत आपला मूड बदलून जातो! तुम्ही खवय्ये आहात का? मग तर बातच निराळी! आवडती मिठाई, वरण-भात आणि साजूक तूप असा बेत, गरमा-गरम गुळाची किंवा पुरण पोळी…अहाहा! आता पुढे काही बोलायलाच नको! दरवर्षी एखादी कोकणवारी आणि मासे हे जणू एक समीकरण होऊन बसतं आपलं! काही 'स्पेशल' दिवशी "आज वेगळं काहीतरी ट्राय करूयात यार" असं अगदी सहजपणे आपल्या तोंडून येतं कारण त्यातून मिळणारा आनंद आणि त्या आठवणी कायम मनाला सुख आणि समाधान देणाऱ्याच असतात.

मध्ये एकदा मी माझ्या एका मित्राशी बोलत असताना विषय निघाला आणि मला कशातून आनंद मिळतो असं त्यानं मला विचारलं. मी म्हणलो, “फोटोग्राफी! मला फोटोग्राफीतून आनंद मिळतो..कुणाला स्वयंपाकातून, कुणाला संगीतातून, कुणाला भक्ती-भावातून, कुणाला पूजा-अर्चेतून, कुणाला लिखाणातून, कुणाला वाचनातून तर कुणाला खेळातून मिळतो तसाच मला तो फोटोग्राफीतून मिळतो. नेदरलँडस् मध्ये पी.एच्.डी करत असताना माझ्या एका थाई मित्राकडून मी हे खूळ डोक्यात घेतलं. 'माझ्याकडे पैसे असते तर मी हा कॅमेरा घेतला असता, ही लेन्स घेतली असती' असं म्हणून त्यानी मला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि मी करवूनही घेतलं. पण त्यात माझाच फायदा झाला. आनंद देणाऱ्या एका वेगळ्याच विश्वाची मला ओळख झाली. खरंच त्याआधी कधी झाडाच्या रंगाकडे निरखून बघितलं नव्हतं, एखादं फुल सांभाळून ठेवलं नव्हतं, बर्फाळलेले डोंगर बघायची इच्छा झाली नव्हती, लॉंग ड्राईव्हला जावसं वाटलं नव्हतं. पण हे सगळं आता करावसं वाटतं ही त्या कॅमेऱ्याची किमया!"

आता हे सगळं जरी खरं असलं तरी जशी वेळ असेल तसं एखादी गोष्ट करण्याकडे माझं मन झुकतं. कंटाळा आला की कधी कधी एखादं कार्टून बघून ते तसंच्या तसं चितारण्याचा प्रयत्न करतो, कधी गाणं गातो, गुणगुणतो. लहर असेल आणि वेळ असेल तर मी पुस्तकांमध्येही गढून जातो, आणि अगदी अश्याच वेळी लिहायलाही सुचतं. शाळेत असताना 'वनवासी कल्याण आश्रमा'साठी निधी गोळा केला होता आणि समाजसेवेतला थोडासा आनंद मी अनुभवला होता. ज्यांच्यासाठी मी हे केलं ते तर अपरिचित होते पण मैत्री आणि प्रेमाचा आनंदही मला भरपूर मिळाला आणि तो सदैव मिळत राहो अशी माझी इच्छा आहे. थोडक्यात काय, तर आनंदी आणि समाधानी राहायचा पूर्ण प्रयत्न मी करत असतो. 

आता तसं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी सर्वांसाठीच तश्या शक्य आहेत आणि सर्वांनाच त्यातून आनंद मिळू शकतो. मग तरीपण जगात इतकं दुःख का? कारण? अति तेथे माती! आनंद मिळवताना कुठेतरी कधीतरी एक मर्यादा ओलांडली जाते. त्यातून स्पर्धा, इर्षा, महत्त्वाकांक्षा वाढत जाते. ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतोय ती गोष्ट मिळवायला, काही विशिष्ट वेळी आपण कोणत्याही थराला जातो आणि पदरी दुःख येतं. मी तर म्हणतो बऱ्याचदा आपण केवळ एवढ्यासाठी स्वतःला दुःखी समजतो कारण आपल्याला हवी ती गोष्ट, जेंव्हा हवी तेंव्हा मिळत नाही, आपल्याला हवी तशी परिस्थिती मोक्याच्या वेळेला नसते. मग अश्यावेळी वेगळं काहीतरी करून बघायचं जे आधी कधी केलं असेल किंवा नसेलही. "आनंदाचे डोही आनंद तरंग" या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे आयुष्यातले असे तरंग शोधायचे ज्यामुळे आपल्याला चैतन्य आणि उत्साह मिळेल आणि निराशा येणार नाही. प्रत्येकवेळी काहीतरी मोठं घडल्यावरच आनंद मिळेल असं नसतं तर छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला पण शिकलं पाहिजे. आनंदयात्री झालं पाहिजे!

Comments

Popular Posts