इंदिरा ते निर्भया

आज ‘सकाळ’मधलं 'चिंटू'चं हास्यचित्र बघून मी हिला म्हटलं, "खरंच पूर्वीपासून मुली प्रामाणिक, हुशार, गुणी, कलाकार आणि मुलं मात्र उडाणटप्पू, दंगेखोर, उद्धट अशी असतील का गं? आणि जर असं असेल तर भारतात पुरुषप्रधान संस्कृती येण्यासाठी आणि टिकण्यासाठी हेच तर कारणीभूत नसेल? कारण अश्या परिस्थितीत सहाजिकच पुरुषांमध्ये, मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होणार आणि त्यांना जर कधी कुठे संधी मिळाली असेल तर त्यांनी ती साधली असणार आणि त्यातूनच पुढे पुरुषसत्ताक पद्धती तर आली नसेल?" ही मला म्हटली, "तुला खरं सांगू का? सध्या तरी भारतात सैतान माजले आहेत!" अतिशय भयानक आणि कटू सत्य ती बोलून गेली.

“...खरोखरच हल्ली रोजचं वर्तमानपत्र बघितलं की ज्या बातम्या दिसतात त्यातून भारतातल्या बालिका, कुमारिका, विवाहित महिला, वयोवृद्ध महिला अशा सगळ्यांभोवतीच विषारी नागांनी विळखा घातलाय असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. एखाद्या स्त्री बद्दल केले जाणारे वाईट आचार-विचार आणि केवळ वासनेपोटी त्यांच्यावर झालेले हल्ले, अत्याचार हेच ते विषारी नाग! आणि हे नाग माझ्यासारख्या सुशिक्षित आणि अशिक्षित तरुणांनी, किशोरवयीन मुलांनी, मध्यमवयीन पुरुषांनी पोसलेत हे वाचून खरंच वाईट वाटतं. असं म्हटलं जातं की फार वर्षांपूर्वी राजा जन्मेजय याने एक नाग-यज्ञ (तक्षकयाग) केला होता ज्यामध्ये त्याने असंख्य विषारी साप आणि नाग मारले होते (कारण जनमेजयाच्या वडिलांचा म्हणजेच राजा परिक्षिताचा एका तक्षक नावाच्या सर्प-दंशाने मृत्यू झाला होता). ह्या यज्ञामागे त्याचा हेतू असा होता की सर्व विषारी साप व नागांचा निःपात व्हावा. असं वाटतं कि असाच एखादा नाग यज्ञ करून हे सर्व विषारी कृतींचे, वृत्तींचे आणि विचारांचे साप आणि नाग मारून टाकावे.

ही बात औरच की पूर्व कालखंडात भारतात स्त्री-पुरुष समानता होती. प्रख्यात व्याकरणकार पतंजली आणि कात्यायन यांच्या साहित्यातून असं दिसतं की वैदिक काळातल्या स्त्रीया सुशिक्षित होत्या; त्यांना स्वतःचा वर स्वतः निवडण्याचे (स्वयंवर) स्वातंत्र्य होते. अश्या पोषक वातावरणात गार्गी, मैत्रेयी यांसारख्या संत-कवी न घडत्या तरच नवल! पण त्यानंतर आलेल्या मध्ययुगीन काळात स्त्रियांचं अस्तित्व डळमळू लागलं; तिच्याकडे वासना आणि विटंबनेच्या नजरेनीच पाहिलं गेलं. तरीही याच चिखलातून मीराबाई सारख्या संत आणि राणी दुर्गावती, रझिया सुलताना, जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांसारखी धुरंधर नेतृत्वं पुढे आली. स्त्री-शिक्षणाला पोषक वातावरण असलं तरी बालविवाहामुळे लहान वयातच दुसऱ्या कुटुंबात जाऊन तेथील वडीलधाऱ्या व्यक्तींचंच म्हणणं शिरोधार्य मानावं लागल्यानं म्हणा किंवा न मिळणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्यामुळं म्हणा या काळात स्त्री मुलभूत शिक्षणापासून परावृत्त होत गेली आणि जणू एक गुलाम होऊन वावरू लागली. जेंव्हा ही समस्या बळावू लागली त्यावेळी सुदैवानं राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, बाळासाहेब पंत, महाराजा सयाजीराव गायकवाड अश्या धोरणी आणि मुत्सद्दी व्यक्तींच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला; ‘असतील मुली तर पेटतील चुली’ या चौकटीतून भारतीय स्त्री किंचित बाहेर आली. या वैचारिक यज्ञाची फलप्राप्ती पुढे भारताला झाली ती डॉ. आनंदीबाई जोशी, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, कमलादेवी चटोपाद्ध्याय, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, किरण बेदी, कमलजीत सिंधू, बचेंद्री पाल अश्या कितीतरी यशस्वी स्त्रियांच्या रुपात! पण...‘यत्र नार्यस्तू पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता II’ असे मानणा-या संस्कृतीत ‘स्त्री जन्मा ही तुझी काहणी-हदयी अमृत नयनी पाणी’ अशी बिकट परिस्थिती आता निर्माण झाली आहे. इंदिरा गांधींचे कुशल आणि कणखर नेतृत्व हे केवळ एक भूतकाळाचा भाग बनलं आणि थोर शिवरायांच्या मराठी भूमीत भारतीय स्त्री सर्वाधिक ‘असुरक्षित’ बनली. याला कारणीभूत कोण असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन या समाजातला प्रत्येक स्त्री आणि पुरुष.

‘सबकुछ चलता है’ या विचारांधतेमुळे हुंडा घेणं आणि देणंसुद्धा कित्येकांना वावगं वाटत नाही. ‘परंपरा’ किंवा ‘प्रथा’ ह्या टायटल्स खाली हे अगदी सहजपणे स्वीकारलं जातं. परिणाम हुंडाबळी आणि हुंड्यापायी स्त्रीवर होणारे हिंसाचार (डोमेस्टिक व्हायोलंस). असे शारीरिक आणि मानसिक छळ केवळ पुरुषच करतात असं नाही तर घरातील इतर स्त्रियासुद्धा यात सामील असल्याचं आजवर दिसून आलं आहे. म्हणजे स्त्रियाच स्त्रियांचा द्वेष करतात त्यांचं जगणं मुश्किल करतात. यावर उपाय म्हणजे अशा प्रसंगांना स्त्रीनं खंबीरतेनं सामोरंजायला हवं आणि पुरुषांनी स्त्रीला बरोरीचा दर्जा द्यायला हवा. एवढंच नव्हे आपण सर्वांनीच हिंसाचाराला किंवा मानसिक छळाला विरोध करायला हवा. जोवर आपण स्त्रीत्वाचा सन्मान करायला शिकत नाही तोवर हे असे प्रसंग घडतच राहणार. आधी म्हटल्याप्रमाणे आजही दुर्दैवाने कित्येक सुशिक्षित आणि अशिक्षित कुटुंबांमध्ये (आणि त्यामुळेच समाजात) भारतीय स्त्रीला व्यक्तीस्वातंत्र्य तसं कमीच आहे. घरातील निर्णय असो किंवा अगदी राजकारणातील निर्णय असो बरेचदा हे निर्णय घरातल्या वा कुटुंबातल्या ‘कर्त्या’ पुरुषाकडूनच घेतले जातात. मुलीनं काय शिकावं, काय करावं अथवा करू नये, कुठले कपडे घालावेत, कुठे आणि कुणाबरोबर जावं हे सगळं पुरुषच ठरवताना आपण बघतो. म्हणजे ज्या भारतातल्या समाजाचा आरसा आपण बघत आहोत त्याच भारतातल्या लेह-लदाख या अत्यंत अशांत सीमावर्ती भागात स्त्रियांसाठी देशातल्या अन्य भागांपेक्षा मुक्त वातावरण आहे; तिथे स्त्रियांना शिक्षणापासून कोणीही अडवत नाही. अमुक इतकंच शीक, किंवा घरकामच कर, अशी सक्ती कुणीच करत नाही. गंमत म्हणजे मुलगी नोकरी करणारी हवी अशी तिथल्या लग्नाळू मुलांची अटच असते. आणि तिथले पुरुष नोकरी-व्यवसाय करतातच की! मग देशातल्या उर्वरित भागात स्त्रियांना अशी वागणूक आपण का देतो? अनेक स्त्रीया अत्याचार, उपासमारीनी का पिळवटून निघतात.

बलात्कार, लैंगिक छळ, रस्त्यावरून जाताना केलेली छेडछाड हा तर एक भस्मासूरच आहे!! स्त्री ही एक उपभोगायची गोष्ट आहे आणि तिला बाकी काहीही महत्त्व नाही ही सडकी विचारसरणी आपल्यातल्या ह्या भस्मासुराला जागवत असते. कुटुंबामध्ये सर्वसाधारणपणे मुलीला मुलापेक्षा कमी स्वातंत्र्य मिळतं. पुष्कळ वेळा मुलाचं बेताल-बीभत्स वागणं पालकच पाठीशी घालतात आणि मग त्यातूनच असे बलात्कारी हैवान जन्माला येतात. दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेलं ‘निर्भया’ प्रकरण हे अत्यंत घृण आणि लांच्छनास्पद होतं. त्यावरून राजधानी दिल्लीत निदर्शनं झाली, राजकारण रंगलं, आणि जे काही टी.व्ही. आणि इतर प्रसार माध्यमांमधून समोर आलं ते पाहून, वाचून माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले: खरंच भारत हा लोकशाहीसाठी लायक देश आहे का? भारताच्या नागरिकांना आपल्या देशाबद्दल काही आदर, आस्था, प्रेम आहे का? भारतात एका स्त्रीला योग्य तो आदर, सन्मान आणि वागणूक का मिळत नाही? पुरुषप्रधान संस्कृती कितपत योग्य आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा बुद्धीने श्रेष्ठ आणि अधिक प्रगत मानावा का? असे कितीतरी बलात्कार, जबरदस्तीचे प्रकार हे देशातल्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या गावात, शहरात रोज घडत असतात. पर-स्त्री तर सोडाच पोटच्या मुलीवर हे प्रसंग लादले जातात तर काय! परदेशातील मुलींचं नशीब पण बिघडवतो आपण? काय हक्क आहे आपल्याला? इतकी विकृत मनोवृत्ती कोणाची, कुठून, कशी आणि का आली? म्हणजे फक्त पुरुषांनीच शांतपणे, ताठ मानेनं जगावं हा कुठला नियम? एकीकडे मुलीला जन्म दिलेला पसंत नाही, मान्य नाही (ज्यामुळे सामाजिक आणि नैसर्गिक समतोल बिघडत आहेच) आणि त्यावर हे असे प्रकार. स्त्रियांनी आणि मुलींनी करायचं तरी काय मग? ह्यावर उपाय काय? कुणी म्हणतं ह्याला मुलीच जबाबदार आहेत, कुणी म्हणतं मुलींनी मर्यादा सांभाळाव्यात(?), कुणी म्हणतं मुलींना मोबाईल वापरायला देऊ नये, कुणी म्हणतं मुलींनी जीन-पँट घालू नये..हे काय कसले उपाय? आणि तुम्ही कुठल्या काळात रहात आहात? जग कुठे चाललंय आणि भारताची दिशा कुठली आहे? मोठमोठ्या प्रगतीच्या, एक प्रबळ जागतिक सत्ता होण्याच्या बाता करता आणि आचरण असं? असे उपाय सुचवून समाजाला पुन्हा जुन्या, अप्रगत, अधिकच पुरुषप्रधान काळात घेऊन जायचा विचार आहे का? म्हणजे स्त्रीनं घराबाहेर पडूच नये, स्त्रीने शिकूच नये - हेच चालू द्यायचं आहे का? काही लोक ठामपणे म्हणतात की हे सर्व चित्रपटांमुळं होतं; पण हे चित्रपट आपण सर्वांमुळेच प्रचलित, प्रसिद्ध होतात. म्हणजे एकेकाळी एका चांगल्या अभिनेत्रीला सिने-क्षेत्रातून बहिष्कृत करण्यात आले; कारण - ती तोकडे कपडे घालते; आणि आता एका पॉर्न-स्टारलाच आपण अभिनेत्री म्हणून स्वीकारतो. आता तुम्ही तुमची आवडच जर बदललीत तर मग असे प्रकार घडणार यात काही नवल नाही. प्रत्येक चित्रपटात एक आयटम गाणं असलं पाहिजे, अभिनेत्रीने निदान एका दृश्यात तरी उत्तेजक कपडे घातलेच पाहिजेत हे नवीन नियम आपणच बनवले. पूर्वी ‘आयटम’ गाण्याशिवाय चित्रपट चालत नसत का? आणि सध्या देखील कितीतरी कलाकार आहेत जे एक वेगळा आणि चांगला प्रयत्न करू पाहतात ज्यातून चित्रपटाचा आनंद तर मिळेलच पण शिवाय समाज सुधारेल, बदलेल, घडेल..पण त्या प्रयत्नांना हवं तसं प्रोत्साहन किंवा कौतुक मिळेलच असं नाही. याला कोण जबाबदार? सरकारला “बेटी बचाव”सारखी धोरणं आणि “निर्भया फंडा”सारखे उपक्रम राबवावे लागावेत यातूनच समाजाची अधोगती दिसते...”

“अरे! तुझं अजून आवरलं नाही? ऊठ आता आणि आवरना प्लीज पटपट..माझं झालंय सगळं मी पुढे होते, आई-बाबा वाट बघत बसतील नाहीतर” मी एकदम भानावर आलो. हातातलं आयपॅड ठेवून आवरायला लागलो. मी निघायच्या आधीच ती घराबाहेर पडली होती आणि बस मिळाल्याचा मेसेजही तिनं केला होता. मीही नेहमीप्रमाणे घाईगडबडीत बस पकडली. रस्त्यावर सायकलवरून एक आई २ मुलांना घेऊन वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जाताना बघितली आणि पुन्हा एकदा माझे विचार सुरु झाले.

“...आपण आपल्यापासूनच बदलाला सुरुवात केली पाहिजे. ‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना’ असं महात्मा फुले म्हणून गेलेच आहेत आता ते प्रत्यक्षात आणायची वेळ झाली आहे. इंदिरा म्हणजेच ‘लक्ष्मी’चे पूजन केले जाणाऱ्या देशात स्त्री-सक्षमीकरण घडवून आणायची वेळ दुर्दैवाने, पण आली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई ते विंग कमांडर पुजा ठाकुर (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना दिल्या गेलेल्या गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व करणारी खंबीर स्त्री), पुरुषांची हुकुमत असलेल्या कुस्ती सारख्या खेळात वर्चस्व सिद्ध करून दाखवणाऱ्या गीता-बबिता कुमारी ह्या बहिणी ते बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत पाहिलं स्थान गाठणारी साईना नेहवाल अश्यांसारख्या कित्येकांच्या उदाहरणावरुन स्त्रिया नक्कीच सक्षम आहेत हे दिसून येतं. त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे आणि आपणही ती ठेवली पाहिजे. यामध्ये कुटुंबाचं पाठबळ खूप महत्त्वाचं असेल. अश्याच खंबीर पाठिंब्यामुळं यशस्वी झालेल्या 'बाप-लेकीं'ची चरित्रं नक्कीच प्रेरणा देतील. महिलांसंदर्भात विविध विकास योजना आता हळू हळू राबवल्या जात आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी नवे कायदे बनवले जात आहेत आणि त्याची फळंही मिळताहेत पण ही विकासाची कास सातत्याने धरावी लागेल. समाजाला स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भात जागृत करावं लागेल, सर्व स्तरांतील स्त्रियांना शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. महात्मा फुले आणि धोंडो केशव कर्व्यांनी हाती घेतलेलं स्त्री शिक्षणाचं कार्य निरंतर चालू राहिलं पाहिजे.

कुठेतरी वाचनात आलं होतं की पूर्वीपासूनच वेतनामध्ये पाळला गेलेला भेदभाव, स्वयंरोजगाराचा अभाव, वेतन न देता नुसतंच राबवून घेणं व बेरोजगारी, कुटीर उद्योगात मालकी हक्क नाहीत अशा अनेक कारणांमुळं स्त्रीचं आर्थिक स्थान पुरुषांपेक्षा दुय्यम राहीलं. पण हल्लीच्या मुली आणि स्त्रीया पुरुषांच्याबरोबरीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत खचित पुढेच आहेत! रिक्षा व टॅक्सी चालक म्हणून, पेट्रोल पंप व्यवस्थापक म्हणून, वित्तीय संस्थाच्या व्यवस्थापक म्हणून, डॉक्टर म्हणून, शिक्षिका म्हणून, उद्योजिका म्हणून, सैनिक म्हणून, राजकारणी म्हणून, कलाकार म्हणून, लेखिका-कवयित्री म्हणून म्हणाल त्या क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. परंतु खेड्यातील महिलांना, मागासवर्गीय स्त्रियांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण साधता येईल का यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. महिलांना आर्थिक अधिकार मिळवून देणं, उत्पादन प्रक्रियेत सहभागी करुन घेणं या गोष्टी केल्या तरच त्यांचा आणि पर्यायानी देशाचा विकास होईल. रोजगारात स्त्रियांना समान संधी उपलब्ध करून देणं आणि त्याचबरोबर समाजातील बेरोजगारी कमी करण्याकडे पाऊलं उचलणं फार गरजेचं आहे. कित्येक पुरुष बेरोजगारीच्या विळख्यात आहेत. ‘एम्प्टी माईण्ड इज डेव्हिल्स वर्कशॉप’ ह्या नियमानुसार कदाचित त्यांना रोजगार मिळाल्याने स्त्रियांवरचे अत्याचार कमी होण्यास मदत होईलही. ‘मेक इन इंडिया’मुळे किती फरक पडतो ते आता कळेलच. 

बसची घंटा वाजताच पुन्हा भानावर आलो; माझा स्टॉप आला होता...उतरून एअरपोर्टच्या आत गेलो. ही माझी वाट बघत थांबलीच होती. सुदैवानी मला खूप उशीर झाला नव्हता. थोड्याचवेळात आई-बाबा त्यांच्या सामानासकट सिक्युरिटी चेक संपवून बाहेर आले. आल्या आल्या आम्ही दोघांनी त्यांना नमस्कार केला. दोघांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला ‘निर्भयी भव!’

Comments

Post a Comment

Popular Posts