बडे देस..छोटी बाते..!!??

आज बऱ्याच दिवसांनी लिहायला बसलो..निमित्त  म्हणजे नजीकच्या काळात घडलेल्या काही घडामोडी आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि नेदरलंड्स (आणि कदाचित इतर युरोपीय) देश यांच्यात झालेली तुलना... छोट्या छोट्या गोष्टी आहेत खरं तर पण खूप फरक पडणाऱ्या आहेत..
विद्यापीठानी दिलेल्या जागेत मी आणि माझा झाम्बियन मित्र रहात होतो. सध्याच्या जगात अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट..! मी आणि माझ्या मित्रांनी एका स्थानिक कंपनीमध्ये इंटरनेटच खात उघडलं आणि इंटरनेटचा आमच्या घरात प्रवेश झाला. आता वर्ष झालं ह्या गोष्टीला. माझा मित्र त्याचा अभ्यास संपवून पुन्हा झाम्बियाला परतला. ह्या वर्षभरात इंटरनेटने फारच क्वचित त्रास दिला.एक-दोनदा संध्याकाळी इंटरनेट बंद पडलं पण पुन्हा सकाळी अगदी व्यवस्थित चालू झालं होतं. पूर्ण वर्षभरात आम्हाला फक्त एकदा कंपनीच्या माणसाला बोलवून प्रोब्लेम सोडवायची वेळ आली होती. जायच्या आधी मित्रानी खात माझ्या नावावर केलं. त्यासाठी आम्ही कंपनीच्या ऑफिस मध्ये जायचं ठरवलं. मित्राला त्याच्या कलीगने सांगितलेल्या पत्त्यावर आम्ही पोचलो तर कळलं ऑफिस नवीन जागी स्थलांतरित झालं आहे. तिकडे जाण्यासाठी पुन्हा अजून १/२ तास लागला. ऑफिस नुकतंच स्थलांतरित झालं असल्याने कुठेही त्याच्या नावाची पाटी दिसत नव्हती. शेवटी लोकांना विचारत विचारत  आम्ही कंपनीच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. सीक्यूरीटीमधल्या एका माणसानी आम्हाला सांगितलं कि आम्ही हे काम फोन वरून करायला हवं ऑफिस मध्ये येऊन नाही. पण तरीही त्या भल्या माणसानी ऑफिसमध्ये फोन करून आम्ही अमुक अमुक कामासाठी आलो आहोत अस सांगितलं. त्याबरोबर उत्तर मिळालं "त्या लोकांना बसवून घ्या आम्ही येतो आहोत." साधारण एक ५ मिनिटांनी एक स्त्री व एक पुरुष आम्हाला भेटायला आले. आणि पुढच्या २० मिनिटांनी आम्ही आमचं काम संपवून परतीच्या वाटेवर होतो. ह्या गोष्टीला आता २ महिने झाले इंटरनेटचं  खात माझ्या नावावर आहे आणि अजिबात कुठलाही त्रास नाही. भारतात कुणाला आलाय असं अनुभव? भारतामध्ये इंटरनेटची सुविधा अजनही इतकी विना-त्रासाची झालेली नाही. इथे आम्हाला परत घरी जाऊन आमचं काम फोनवर करावं लागलं नाही..भारतामध्ये एका खेपेत किंवा एका फोन मध्ये कधीही काम होत नाही..!
मी संशोधन क्षेत्रात आहे. ह्या क्षेत्रात आपलं संशोधन लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचावं ह्यासाठी सर्वच धडपड करत असतात. परंतु काही लोक (प्रमाण कमी) सोयीस्कररित्या पळवाट शोधून केवळ लवकर प्रसिद्धी मिळावी यासाठी खोटे किंवा चुकीचे निष्कर्ष आणि संशोधन चापून मोकळे होतात. अशी एक एक घटना नुकतीच नेदरलंड्समध्ये घडली. ह्या घटनेचे पडसाद पार्लमेंटमध्ये देखील उमटले. त्यावर खूप चर्चा केली गेली आणि भविष्यात देशासाठी अशी लाजिरवाणी गोष्ट घडणार नाही यासाठी उपाय योजना करण्यात येईल असे एकमताने ठरले. पूर्वी अशाच एका घटनेशी निगडीत संशोधकाला ह्या देशात कुठलेही संशोधन करण्यास मनाई करण्यात आली. भारतामध्येही मध्ये अशी एक दुर्दैवी घटना घडली परंतु त्या संशोधकाने चुकीचे खापर त्याच्या विद्यार्थ्यांच्या माथी फोडले. ह्या संशोधकाच्या मागच्या ६ पेपर्सवर प्रश्नचिन्ह ठेवण्यात आलं आहे. आपल्या लोकसभेत किंवा राज्यसभेत ह्या गोष्टींवर कितपत लक्ष दिलं जातं हे आपल्या नेत्यांनाच माहित..! त्यानंतर ह्या प्रकरणावर काय कारवाई केली गेली हे अजून ऐकिवात आले नाही.
नुकतीच भारतामध्ये बक्षीस वाटपावरून क्रिकेट आणि हॉकी यांची तुलना झाली. जितका खेळ लोकप्रिय तितकी बक्षिसांची रक्कम मोठी हे समीकरण जगात सर्वत्र आहे. नेदरलंड्समध्ये देखील फुटबॉल ह्या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यामुळे ह्या खेळात मिळणारी बक्षिसेही मोठ्या रकमेची असतात. मग नेमका फरक कोणता? फरक आहे तो इतर खेळांना मिळणाऱ्या महत्त्वाला. भारतामध्ये सर्वच खेळांना तितकंच महत्व आहे असं मला वाटत नाही. काही स्थानिक खेळांना फक्त स्थानिक जनताच प्रेक्षक म्हणून लाभते. गेल्या २ वर्षांच्या वास्तव्यात मी नेदरलंड्समध्ये फुटबॉल, हॉकी, बुद्धीबळ, आईस स्केटिंग, क्रिकेट, पोहणे ह्या सर्व खेळांना एकसारखीच गर्दी बघितली आहे. ह्या सर्व खेळांना मिळणारं प्रोत्साहन, खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा हे देखील तितकंच उत्तम होतं. कुठलाही एका खेळाला खूप जास्त सोयी-सुविधा आणि दुसऱ्या खेळाकडे गरजेपुरतं लक्ष दिलेलं असं चित्र मला अजूनतरी बघायला मिळालेलं नाही. इथे पालक मुलांना सर्वच खेळांसाठी प्रोत्साहन देतात. व्यायाम आणि खेळ हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. मग भारतात हे सर्वांना का शक्य नाही?

दोन देशांमधले संबंध टिकावेत अधिक दृढ वावेत ह्या साठी दोन देश खूप प्रयत्न करतात. त्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशात शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणं. ह्याच प्रयत्नच फळ म्हणून मला नेदरलंड्समध्ये येऊन शिकायची संधी मिळाली. मला इथे आल्यापासून राहायची, खायची कशाचीही गैरसोय झालेली नाही. मी इथे आलो तेंव्हा माझ्या इथल्या विद्यापीठानी माझ्यासाठी राहायच्या जागेचा बंदोबस्त केलं होता. परंतु जेंव्हा इथली एक विद्यार्थिनी भारतात शिकायला आली त्यावेळी भारतात आल्या आल्या तिला राहायसाठी जागा शोधायसाठी  स्वतः धडपड करावी लागली. "डॉर्मिटरीमध्ये अजिबात जागा नाही. तुला तुझी राहायची सोय स्वतःच करावी लागेल.." असे उत्तर तिला पहिल्या दिवशीच मिळालं. अनोळखी प्रांतात असा आलेला पहिलाच अनुभव त्या प्रांताबाबत एक मत बनवून जातो. मी त्या विद्यार्थिनीला तिच्या भारतातल्या अनुभवाबद्दल विचारल्यावर तिचं उत्तर असं होता- "थिंग्स वर प्रीटी ब्याड्ली ऑर्गनाईझ्ड..!"  आता आपण ह्यापुढे काय बोलणार..! कदाचित ह्यामुळेच त्या विद्यापिठाच नाव सहायक विद्यापीठांच्या (Partner  Universities) यादीतून नाहीसं झालं असावं.
तर असे हे अनुभव...! कदाचित अशा छोट्या गोष्टीमुळेच दोन्ही देशांच्या प्रगतीत फरक पडत असवा..! योगायोगानी नुकताच World Economic Forum नि एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारत हा अजूनही Developing countries मध्ये तर नेदरलंड्स Innovation Derived countries मध्ये मोडतात.
अश्या लहान सहान गोष्टीनीसुद्धा कदाचित खूप मोठा फरक पडू शकेल..!! तुम्हाला काय वाटतं?

Comments

  1. khoop sundar lihile ahe, mala pan hach farak janawtoy ata...

    ReplyDelete
  2. मी पहिल्यापासून एम्.टी.एन्.एल् चे कनेक्शन वापरतो.अधूनमधून काही तास बंद पडण्यापलीकडे केव्हाच अडचण आलेली नाही.

    ReplyDelete
  3. Sharayu: इन्टरनेट हे एक उदहारण होत.. पण इतर गोष्टीतही एका खेपेत किंवा एका फ़ोन नी काम झालाय असा अनुभव मला तरी भारतात नाही आला.. :(

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts